Skip links

आधुनिक आर्किटेक्चर

आर्किटेक्चर हा स्वतःचा अभ्यास आहे, ते माणसाने त्याला स्वतःला ओळखण्याची कला आहे आणि जो स्वतःला वाचू शकतो तो इतर कुणालाही समजून घेऊ शकतो अशी माझी खात्री आहे.

माझ्या सवयी कोणत्या माझ्या कुटुंबियांच्या गरजा काय आहेत आणि आम्हाला सुंदर आणि नीटनेटकं जगण्यासाठी आमच्या सवयींमध्ये कोणकोणते बदल करावे लागणार आहेत या गोष्टींचे निरीक्षण आणि अभ्यास म्हणजे आर्किटेक्चर.

पूर्वीच्या काळी स्लॅबची टेक्नॉलॉजी अस्तित्वात नव्हती, त्यामुळे दरवाजावर आणि छतासाठी आर्चेस डोम्स आणि गोपुरे बांधत असत.

आर्चेसच्या प्रकारांवरून पूर्वी आर्किटेक्चरचे प्रकार पडले होते, टोकदार आर्चेस असलेले गॉथिक आर्किटेक्चर, तर छतासाठी डोम असेल तर ते मुघल आर्किटेक्चर, गोपुरे आणि महिरपी आर्चेस जिथे असतील ते सर्व हिंदू आर्किटेक्चर.

दरवाजे आणि खिडक्यांचे आर्चेस आणि छत एकसारखे दिसावे यासाठी त्यांचे डिझाईन समान ठेवले जात असे.

त्यामुळे आर्किओलॉजीच्या अभ्यासामध्ये जेव्हा कोणत्याही पुरातन स्ट्रक्चर वरील छत आणि दरवाजावरील आर्चेस यामध्ये फरक दिसला तर ते छत नंतरच्या काळात दुरुस्त करून बदललं गेलं आहे याचा तो पुरावा मानला जातो.

मूळ आर्चेस कोणत्या काळातली आहेत आणि छत केव्हाचं आहे, यावरून ते कुणी बांधलं असावं याचा अभ्यास केला जातो.

लांब रुंद खोल्या आणि उंचच्या उंच घरं, हि रोमन आर्किटेचरमध्ये सापडतात. पूर्वी लोकं डोक्यावर जशी चित्रविचित्र प्रकारचा घेर असणाऱ्या आणि फारशा उपयोगी नसलेल्या टोप्या ज्या प्रमाणे घालत असत, तसं मला ते जुनं बांधकाम वाटतं. एवढ्या उंच आणि मोठ्याच्या मोठ्या खोल्या आणि त्यामध्ये छोटी छोटी माणसं, जुन्या चर्चेस मध्ये गेलं की त्या तसल्या आर्किटेचरची कल्पना येते.

आधुनिक आर्किटेचरमध्ये प्रमाणबद्धता किंवा प्रमाणशीरता याला सर्वात महत्व आहे, किंबहुना आर्किटेक्चरचा तो प्राण आणि श्वास आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.

पूर्वीच्या काळी स्ट्रक्चर्समध्ये टिकाऊपणा आणि सौंदर्य खूप असे पण उपयुक्तता मात्र बघितली जात नसे, जुन्या वाड्यातल्या किंवा जुन्या किल्ल्यांमधील बांधकामातल्या खोल्या बघितल्या की खोल्यांचे आकार त्यांची मापं आणि त्या मध्ये हवा उजेड खेळण्याचं प्रमाण अतिशय अशास्त्रीय असेच होते.

पूर्वी आर्किटेक्चर म्हणजे वास्तू विषारदाने केलेले निरनिराळे चमत्कारिक प्रयोग म्हणूनही बघितले जात असे, गोलघुमट मध्ये फिरणारे आवाज किंवा गोवळकोंड्याच्या किल्ल्यात असणारे निरनिराळे अचाट आवाजाचे खेळ किंवा रायगडावर मेघडंबरी पासून चहूकडे स्पष्टपणे ऐकू येणारा आवाज, असे अनेक प्रयोग आर्किटेचरमध्ये केले जात असत पण त्याची उपयुक्तता किती? हा वादाचाच मुद्दा आहे हे मात्र नक्की.

बहुदा आपलं नांव चिरकाल जगात तिकून रहावं यासाठी पूर्वी राजेरजवाडे अशा वास्तूंचं बांधकाम करीत असत.

आधुनिक आर्किटेक्चर मध्ये टिकाऊपणा आणि सौंदर्य याचबरोबर स्ट्रक्चरच्या उपयुक्ततेलाही सर्वात जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे.

निरनिराळ्या काळात बदललेल्या बांधकाम साहित्याचा त्या त्या वेळच्या आर्किटेक्चरवर सर्वात जास्त स्वतःची छाप टाकलेली आहे.

लाकूड ग्रॅनाईट मार्बल लॅट्राईट बसाल्ट इत्यादी दगडांचा बांधकामात वापर होत असे आणि त्या साहित्याची छाप त्या त्या काळातल्या आर्किटेक्चरवर नक्कीच पडलेली आहे.

काँक्रीट टेक्नॉंलॉजीची जगाला ओळख झाल्यामुळे आज गगनचुंबी इमारती किंवा कोणत्याही आकारातील घरं बांधणे आता शक्य झालेले आहे.

आधुनिकता आणि टेक्नॉलॉजीमुळे पूर्वी फक्त राजेरजवाड्यांपुरते मर्यादित असलेले हे शास्त्र आता आम जनतेसाठी खुले झालेले आहे.

छोटासा घर होगा, बादलोंकी छाव में, हे प्रत्येक सामान्य माणसाचे न गळणारं घर बांधण्याचं स्वप्नं आज पूर्ण होऊ शकते.

माणसांच्या आणि स्वतःविषयी केलेल्या निरीक्षणांतून विकसित झालेली आर्किटेक्चर ही एक कला आहे, घर बांधू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा तो हक्क आहे आणि आता तर कायद्याने ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

माणूस निरीक्षणांतून जसे स्वतःचे सुयोग्य आणि सुडौल घर बांधायला शिकला त्याच प्रमाणे आता त्याला आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा तसाच सुडौल आणि नेटका आणि प्रमाणबद्ध असावा असे वाटू लागले.

रुंद स्वच्छ आणि प्रकाशमान रस्ते, पत्ता सहज सापडू शकेल अशी रचना आणि पाणी ड्रेनेज वीजपुरवठा इत्यादी सुविधा सहज प्राप्त होऊ शकतील असे इन्फ्रास्ट्रक्चर असावे असे त्यास वाटू लागले.

त्यातूनच टाऊन प्लॅनिंगचा जन्म झाला.

सुंदर आणि मोकळ्या हवेशीर शहरांसाठी गरज असलेली जागा कशी मिळणार? हा प्रश्न एफएसआयच्या रिझर्व्हेशन आणि टीपी स्कीम सारख्या संकल्पनांच्या सहाय्याने कायद्याने सोडविला.

एखाद्या संगीतकाराला त्याच्या रियाझासाठी उपयुक्त असणारे घर बनवून देणं किंवा एखाद्या डॉक्टरला त्याच्या बिझी शेड्युल मध्ये त्याच्या वस्तू सहज हाताशी ठेवता येतील आणि घेताही येतील असे सोयिस्कर घर बांधून देणं किंवा एखाद्या राजकीय नेत्याला त्याच्या घरी असणाऱ्या लोकांच्या राबत्याचे सहजपणे व्यवस्थापन करता येईल असे घर आरेखित करून देणे हे नव्या युगातील आर्किटेक्टचे खरे कसब आहे.

आधुनिक काळातील आर्किटेक्चर हे कला आणि शास्त्र यांचा सुरेख संगम आहे.

Opinions